बिहारमधे, NDA च्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या पाटण्यात होणार आहे. NDA चे घटक पक्ष असलेल्या भाजपा, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या पाच पक्षांचे एकूण २०२ आमदार या बैठकीला उपस्थित राहतील. NDA च्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीच पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. निवड झाल्यानंतर विधीमंडळ पक्षनेता राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे धावा करेल.
त्याआधी भाजपा आणि संयुक्त जनता दल यांच्याही विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी स्वतंत्रपणे बैठका होतील. त्या ही उद्या होण्याची शक्यता आहे. भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी पक्षानं उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रकाश मौर्य यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
दरम्यान, सरकार रचना, मंत्रिमंडळाचा आकार, आणि विविध घटक पक्षांमध्ये मंत्रीपदाच्या वाटपासंदर्भात भाजपा आणि संयुक्त जनता दल या प्रमुख पक्षांमध्ये सातत्यानं चर्चा सुरु आहेत. नव्या सरकारचा शपथविधी येत्या गुरूवारी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच एनडीएचे वरीष्ठ नेते या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.