बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. ८९ जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर संयुक्त जनता दल ८५, लोकजनशक्ती पार्टी रामविलास १९, हिंदुस्तान आवामी मोर्चा ५, राष्ट्रीय लोक मोर्चा ४ जागांवर विजयी झाले. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला केवळ ३५ जागा मिळाल्या. यात राजद २५, काँग्रेस ६, भाकप माले २, माकपला एका जागेवर यश आलं. एमआयएम पक्षाने पाच जागा जिंकत पुन्हा एकदा बिहारमधे आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत ६९ पूर्णांक १३ शतांश टक्के इतकं मतदान झालं.
बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात साजरा झाला. बिहारी जनतेनं पुन्हा एकदा विकसित बिहारसाठी, समृद्ध बिहारसाठी मतदान केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
देशातल्या सात राज्यांमधल्या आठ विधानसभा पोटनिवडणुकीचे निकालही काल जाहीर झाले. यात भाजपा आणि काँग्रेस यांना प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळाला. आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, मिझो नॅशनल फ्रंट आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळाली.