बिहार विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी काल मतदान झालं. या टप्प्यात ६९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान झालं होतं, त्यामुळे दोन्ही टप्पे मिळून बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण ६६ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतकं मतदान झालं आहे. बिहारमधे आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमधे यंदा सर्वात जास्त मतदान झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. यात पुरुष मतदारांचं प्रमाण ६२ पूर्णांक ८ दशांश टक्के तर महिला मतदारांचं प्रमाण ७१ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकं नोंदवलं गेलं आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारची हिंसा न होता मतदान शांततेत पार पडल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.
१४ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.