डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Bihar Elections : शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 

 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल. काही मतदारसंघांमधे सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल. या टप्प्यात १ हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी ७० लाख मतदार या उमेदवारांंमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंडला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं. तसंच भारत-नेपाळ सीमेवरील मैत्री एक्स्प्रेस रेल्वे सेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 

या टप्प्यात भाजपा ५३, संयुक्त जनता दल ४४ आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास १५ जागांवर निवडणूूक लढत आहे. तर महाआघाडीमधे राजद ७१, काँग्रेस ३७, व्हीआयपी  ८, भाकप माले ६, भाकप ४ आणि माकप एका जागेवर निवडणूक लढत आहे. सहा मतदारसंघांमधे महाआघाडीतल्या उमेदवारांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे.