बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक राज्यभर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहेत. पहिल्या टप्प्यात १२२ मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
भोजपूर जिल्ह्यात आरा इथं झालेल्या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीएचा जाहीरनामा हा बिहारच्या विकासासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सिंचन या क्षेत्रांवर विशेष लक्ष दिलं असून महिलांना सक्षम करण्यासाठी “लखपती दीदी” आणि मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
बेगुसराय इथं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, बिहारचे युवक रोजगाराची मागणी करत आहेत आणि सरकारनं रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी तारापूर इथं सांगितलं की, बिहारचा विकास स्थिर आणि योजनाबद्ध पद्धतीने सुरू आहे.
आज प्रधानमंत्री मोदी भोजपूर, नवादा आणि पाटण्यात सभा व रोड शो घेत आहेत, तर राहुल गांधी आणि महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या राज्यभर सभा होत आहेत. दरम्यान, पाटणा जिल्ह्यातल्या मोकामा मतदारसंघात हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत.