बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सर्व मतदारसंघातलं चित्र स्पष्ट होईल.
कैमुर जिल्ह्यातल्या मोहनिया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार श्वेता सुमन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. सुमन यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांचा अर्ज रद्द केला. काल, भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात या संदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही, हे प्रकरण स्क्रीनिंग कमिटीकडे पाठवायला हवं होतं. मात्र, ही कारवाई भाजपच्या दबावाखाली झाल्याचा आरोप श्वेता सुमन यांनी केला आहे.
रालोआ सरकार सत्तेत आलं तर बिहारला विकसित राज्य बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी आज एका प्रचारसभेत दिलं. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही आज विविध ठिकाणी सभा घेतली.
महाआघाडी सत्तेत आली तर स्वयंसहायता गटांशी संबंधित जीविका दीदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी दिलं आहे. बिहारचे काँग्रेस प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी महाआघाडी राज्यातले प्रश्न आणि समस्यांवर एकजुटीने काम करेल, असं आश्वासन दिलं आहे.