बिहार विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ६ नोव्हेंबरला मतदान होणार असून, निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली जात आहेत.
महाआघाडी सत्तेत आली तर स्वयंसहायता गटांशी संबंधित जीविका दीदी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी दिलं आहे. स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या प्रत्येक जीविका दीदीला आरोग्य विमा आणि इतर लाभांसह दरमहा ३० हजार रुपये वेतन देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेत आली, तर राज्याच्या विकासाच्या गतीला आणखी वेग दिला जाईल असं आश्वासन भाजपाचे नेते देत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत आज प्रचाराच्या धोरणासंदर्भात महाआघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.