बिहारमध्ये विधासभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली. महाआघाडी सत्तेत आली तर विकासशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मात्र अद्यापही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अस्पष्टता असल्याची टीकाही गेहलोत यांनी केली.
दरम्यान, तेजस्वी प्रसाद यादव यांनी महाघाडीच्या सदस्यांचे आभार मानले असून, आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी भावना व्यक्त केली आहे.