बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रधानमंत्र नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ पक्ष नेते उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप जाहीर झाल्यानंतर पक्षाचं धोरण आणि उमेदवारांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्याच्या उद्देशाने भाजपानं ही बैठक घेतली.
दरम्यान एनडीएने काल बिहार विधानसभा निवडणुकांसाठी जागा -वाटप जाहीर केलं. भाजप आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 101 जागांसाठी लढतील, तर लोक जनशक्ती पक्ष राम विलास 29 जागांसाठी लढणार आहे. राष्ट्रवादी लोक मोर्चा आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाला प्रत्येकी सहा जागा दिल्या आहेत. निवडणुकीत NDA चा सामना, विरोधी पक्षांच्या INDI आघाडीशी होणार आहे. INDI आघाडीनं अद्याप आपलं जागा वाटप जाहीर केलेलं नाही. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर, अशा 2 टप्प्यात मतदान होणार आहे.