डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 16, 2025 3:42 PM | Bihar Election

printer

बिहारमधे सरकारस्थापनेच्या हालचालींना वेग

बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राज्यात सरकार स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. या घडामोडींबद्दल अधिक माहिती (बिहार विधानसभा निवडणुकांमधल्या दणदणीत विजयानंतर केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (राम विलास) चे अध्यक्ष चिराग पासवान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष संतोष सुमन यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल पाटणा इथं जदयू चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. जदयू चे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनीही काल संध्याकाळी नवी दिल्लीत भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत नवीन सरकार स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
तर दुसरीकडे, जदयूनं आपल्या सर्व ८५ नवनियुक्त आमदारांना पाटणा इथं बोलावून घेतलं आहे. उद्या, जदयू विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, यावेळी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल.
एनडीएचे पाचही घटक पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतील, त्यानंतर एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, यावेळी एनडीएच्या नेत्याची निवड केली जाईल.)
बिहार मध्ये उद्या राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होण्याची शक्यता असून, यावेळी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली जाईल.
दरम्यान, निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर राजद मधले पक्षांतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले आहेत. पक्षाच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री, लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबियांबरोबरचेही संबंध तोडत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं आहे.