बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सात वाजता सुरुवात झाली. १८ जिल्ह्यात मिळून १२१ मतदारसंघामध्ये १हजार ३१४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. सकाळी ११ वाजेपर्यंत २७ पूर्णांक ६५ शतांश टक्के मतदान झालं . सर्वात जास्त मतदानाची नोंद बेगुसरायमधे ३० पूर्णांक ३७ शतांश टक्के इतकी झाली.
बिहार विधानसभेसाठी आज पहिल्या टप्प्याचं मतदान १२१ जागांवर होत असून बिहारची राजधानी पाटणा, वैशाली, नालंदा, भोजपूर, मुंगेर, सारण, सिवान, बेगुसराय, लखीसराय, गोपाळगंज, मुझफ्फरपूर, दरभंगा, मधेपुरा आणि सहरसा या मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिमरी बख्तियारपूर, महिषी, तारापूर, मुंगेर, जमालपूर आणि सूर्यगढ विधानसभा मतदारसंघातल्या ५६ मतदान केंद्रांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. मतदान शांत, मुक्त आणि निःपक्षपाती वातावरणात पार पडण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सर्व ४५ हजार ३४१ मतदान केंद्रांवरून वेबकास्टिंग केले जाईल. पाटणा इथल्या निवडणूक कार्यालयामध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, यांनी बख्तियारपूर इथं, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुंगेर इथं मतदान केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनी उत्साहाने मतदान करावं असं आवाहन केलं असून, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराने वेग घेतला आहे. दोन्ही टप्प्यांची मतमोजणी येत्या १४ नोव्हेंबरला होणार आहे.