बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज झालं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६७ पूर्णांक १४ शतांश टक्के मतदान झालं. किशनगंज, कटिहार आणि पूर्णिया या मतदारसंघांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं असून किशनगंजमध्ये सर्वाधिक म्हणजे ७६ पूर्णांक २६ टक्के मतदान झालं आहे. या टप्प्यात १ हजार ३०२ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. येत्या १४ तारखेला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, ७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममध्ये डम्पा आणि ओदिशात नुआपाडा या मतदारसंघांसाठी आज मतदान झालं. मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी म्हणजेच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशीच होणार आहे.