बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी असलेली प्रचाराची मुदत उद्या संपत असल्यामुळे आज प्रचार शीगेला पोचली आहे. रालोआ आणि महागठबंधन या आघाड्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी आज बिहारच्या वेगवेगळ्या भागात प्रचारसभा आणि रॅली घेतल्या.
प्रधानमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी सहरसा, कठीहार या ठिकाणी घेतलेल्या प्रचारसभेतमहागठबंधन हा सक्षम नसलेल्या राजकीय पक्षांचा समूह असल्याचा आरोप केला. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस तयार होणार नाही असंही मोदी यावेळी म्हणाले.
जेष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेहर आणि सितामढी इथं प्रचारसभा घेतल्या. बिहारमधला अन्नटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रातलं एनडीए सरकार गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं. योगी आदित्यनाथ यांनीही अनेक सभांमधून काँग्रेस तसंच राजद वर टीका केली.
प्रधानमंत्री नरेद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत किती लोकांना खरोखरचा रोजगार दिला हे लोकांना सांगावं असं आव्हान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वैशाली जिल्ह्यातल्या राजापाकार इथं घेतलेल्या प्रचारसभेत दिलं.