बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. एनडीए आणि महाआघाडीच्या ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी आज विविध ठिकाणी सभांना संबोधित केलं. महाआघाडीचं सरकार आलं तर वक्फ कायदा रद्दबातल केला जाईल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांचं मानधन दुप्पट केलं जाईल, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना निवृत्तीवेनत दिलं जाईल असं आश्वासन राजद नेते तेजस्वी यादव यांनी दिलं. ते अरारिया, कटीहार आणि किशनगंज इथल्या प्रचारसभांना संबोधित करत होते. वक्फ कायदा रद्द करण्याच्या यादव यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली. तसंच विरोधी पक्षाचे नेते नोकरी देत नाहीत तर हिसकावून घेतात असं प्रसाद म्हणाले.
काँग्रेस नेते अशोक गेहलोत, विकासशील इन्सान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी, जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनीही प्रचारसभांना संबोधित केलं. प्रचारादरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी, स्थलांतर, बिहारचा विकास आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.