बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोचला आहे. 

भाजपा बिहारला विकसित राज्य बनवेल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद इथल्या सभेत सांगितलं. राजद आणि काँगेसनं बिहारच्या युवावर्गाला भरकटवण्याचा प्रयत्न केला अशी टीका प्रधानमंत्र्यांनी भाबुआ इथल्या प्रचारसभेत केली. 

बिहारमध्ये सत्ता मिळताच राज्याला पूरमुक्त करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु केलं जाईल, असं आश्वासन भाजपाचे नेते अमित शहा यांनी एका प्रचार सभेत दिलं. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गोविंदगंज इथं,  तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात सभा घेतल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमरपूर इथं सभा घेतली. बिहारच्या जनतेनं अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत उभं राहणारं, त्यांच्यासाठी काम करणारं सरकार निवडावं, असं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रोहतास मधल्या चेनारी इथं सभा घेतली. 

महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी पूर्णिया, अरारिया, भागलपूर आणि बांका इथं प्रचार सभा घेतल्या.