बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रालोआ आणि महाआघाडीचे प्रमुख नेते आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचारही जोरदार झाला. सर्व पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारकांनी मतदारांना आपली बाजू पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. यात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपही झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी अनेक प्रचारसभा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आजही ठिकठिकाणी सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार आज औरंगाबाद, गया आणि कैमुर जिल्ह्यात अनेक सभांना संबोधित करणार आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सासाराम आणि अरवल इथं सभा घेतील. तसंच वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह औरंगाबाद आणि कैमूर इथं प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी पुर्णिया आणि किशनगंज इथं महाआघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. राजद नेते तेजस्वी यादव भभुआ, रोहतस आणि औरंगाबाद जिल्ह्यांमधे अकरा सभांना संबोधित करणार आहेत. तसंच जनसुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांच्यासह बसपा आणि एमआयएम चे नेतेही आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहायक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. १ हजार ३०२ उमेदवार रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १४ नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.