बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं आज तिथल्या विविध प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी, केंद्रीय पोलीस दल आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निवडणुकीच्या काळात, काळा पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचा धोका ओळखून करायच्या उपाययोजनांबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं त्यांच्याशी संवाद साधला.
निवडणुका मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्व वातावरणात व्हाव्या यासाठी उपस्थितांनी मतं मांडली. या बैठकीला प्राप्तीकर विभाग, सीमा शुल्क विभाग, बँक, रेल्वे आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं, सीमापार सुरक्षा विषयक पैलूंबाबत बिहारच्या पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत, राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाच्या प्रमुखांशी देखील चर्चा केली.