झारखंडमधल्या धरणांमधून काल रात्री उशिरा फाल्गु नदीत पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे बिहारमधल्या फाल्गु, लोकायिन, मूहाने आणि इतर पावसाळी नद्यांच्या पाणीपातळीत अनपेक्षितरित्या वाढ झाली आहे.
यामुळे नालंदा, जेहानाबाद आणि गया जिल्ह्यांमध्ये पूर आला असून नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे, तसंच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासन रात्रभर ध्वनिक्षेपकांवरून सतत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असून गया जिल्हा न्यायदंडाधिकारी शशांक शुभांकर यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले आहेत.
राजस्थानमध्येही अतिवृष्टी सुरु असून कोटा विभागात त्याची सर्वात जास्त झळ बसली आहे. कोटातल्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावरची वाहतूक ठप्प आहे. सवाई माधोपूर रेल्वे स्थानकात पाणी साठल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद आहे.
लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाची पथकं बचाव आणि मदतकार्य करत आहेत. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून पिकांच्या नुकसानीच्या नोंदी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.