भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर

भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज जाहीर झाला. व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय बँकेनं सलग १०व्या आढाव्यात घेतला आहे. त्यामुळे रेपो दर साडेसहा टक्क्यांवर, स्टँडींग डिपॉझिट फॅसिलिटी दर सव्वा सहा टक्क्यांवर आणि मार्जिनल डिपॉझिट फॅसिलिटी दर पावणे सात टक्क्यांवर कायम आहे.

रिझर्व बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक गेल्या सोमवारपासून मुंबईत झाली. त्या नंतर हा आढावा जाहीर करण्यात आला आहे. यावेळच्या चलनविषयक धोरणात चलनफुगवट्याबाबत दीर्घ काळासाठी जैसे थे भूमिका स्वीकारण्याचा निर्णयही पतधोरण समितीने घेतला. किरकोळ चलनफुगवट्याचा दर चार टक्के पर्यंत रोखण्याच्या दृष्टीनं आणि विकासाला पाठबळ देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं समितीने म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ६ पूर्णांक सात टक्के राहिला, मात्र पूर्ण वर्षासाठी जीडीपी दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील असा अंदाज आढाव्यात व्यक्त करण्यात आला आहे. रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची पुढची बैठक येत्या ४ ते ६ डिसेंबर दरम्यान होणार आहे.