देशभरात आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण आनंदात साजरा केला जात आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी येणारा हा सण भाईदूज, यम द्वितीया, भाई टीका या नावानंही ओळखला जातो. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं औक्षण करतात. तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण्याचं वचन देतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावाबहिणीच्या अतूट नात्याचं प्रतीक असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येतो, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बहीणभावाचं हे नातं आणखी दृढ होत राहो, अशी कामना त्यांनी केली आहे.
दरम्यान, भाऊबीजेनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत बेस्ट प्रशासन आज मुंबई आणि परिसरात १३४ अतिरिक्त बसेस चालवणार आहे. या बस मुंबई उपनगरांबरोबरच ठाणे, मीरा रोड आणि भायंदर इथून चालवल्या जाणार आहेत, असं बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.