ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. चंदनशिव हे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते. ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातली स्थित्यंतरं चित्रित केली. त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह, ललित, समीक्षा आणि संपादन आहेत.
२८व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं. राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष होते. त्यांच्या साहित्याला राज्य शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
जांभळढव्ह, अंगार माती, नवी वारूळ, बिरडं, मरणकळा हे त्यांचे कथासंग्रह, भूमी आणि भूमिका हा समीक्षा ग्रंथ तर रानसय हा ललित संग्रह गाजला होता. चंदनशिव यांची लाल चिखल ही कथा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आली होती.