भारत आणि मलेशियानं दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरोधात सहकार्य बळकट करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये, भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना तोंड देण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या तिसऱ्या बैठकीत, दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादाच्या परिस्थितीबाबत चर्चा केल्याचे नमूद केलं आहे.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील दहशतवादविरोधी विभागाचे सचिव विनोद बहाडे आणि मलेशियाच्या गृहमंत्रालयाचे अवर सचिव मोहम्मद अझलन बिन रझाली यांनी बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवलं. उभय देशांनी दहशतवादाचा निषेध केला आणि व्यापक आणि शाश्वत पद्धतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य भक्कम करण्याच्या गरजेवर भर दिला.