भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आणि कालातीत आहे. भगवान बुद्ध सर्वांचे आहेत आणि ते सर्वांना जोडून ठेवतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीतल्या राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, भगवान बुद्धांशी संबंधित, पवित्र पिप्रावा अवशेषांच्या, भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे अवशेष भारतात परत आल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.
हे अवशेष भारताबाहेर नेणाऱ्यांसाठी त्या फक्त निर्जीव वस्तू होत्या, म्हणून या वस्तूंचा लिलाव करायचा प्रयत्न त्यांनी केला, पण भारतानं तसं होऊ न देता भगवान बुद्धांच्या कर्मभूमीत हे अवशेष परत आणले, असं प्रधानमंत्री म्हणाले. भगवान बुद्धांशी संबंधित विविध ठिकाणी असलेले त्यांचे अवशेष म्हणजे त्यांच्या संदेशाचं जिवंत प्रतीक आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताने हे अवशेष विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टींनी सांभाळून ठेवले आहेत, तसंच जगभरात अशा प्रकारच्या ठिकाणांच्या विकासासाठी शक्य होईल ते योगदान देण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, किरेन रिजिजू, रामदास आठवले, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्ली सरकारमधले मंत्री, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी आणि इतर यावेळी उपस्थित होते.