आदिवासी समुदायाचे नेते, आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी गौरव सप्ताहाचं स्वरूप घेतलेल्या या उत्सवात देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात. यंदा भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीमध्ये संसद भवन संकुलात भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे.