बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, तसंच गोपीनाथ मुंडे यांनीही हाच वारसा पुढे नेला. त्यामुळे जिल्ह्यातील जातीपातीचं राजकारण थांबलं पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी प्रवर्गातल्या अनेक जाती आजही मागास आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणात वाटा पडणं योग्य नाही. ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण न मागता जे मिळालं आहे ते आनंदाने स्वीकारा असं आवाहनही पंकजा यांनी मराठा समाजाला केलं.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे असं आश्वासनही त्यांनी दिलं. तर पंकजा मुंंडे शेतकऱ्यांना मदत मिळवून देतील असा आपल्याला विश्वास असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.