बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना यांना फाशीची शिक्षा, मायदेशात जायला हसिना यांचा नकार

बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधीकरणाने माजी प्रधानमंत्री शेख हसिना यांना आज फाशीची शिक्षा सुनावली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

 

ऑगस्ट २०२४ मधे विद्यार्थी आंदोलकांना मारण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचे आदेश हसिना यांनी दिले, असं न्यायाधीकरणाने म्हटलं आहे. गुन्हेगारी कट रचणं, चिथावणी देणं यासह अनेक गुन्ह्यांसाठी हसिना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामुन हे माफीचे साक्षीदार झाल्याने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. तसंच सैन्याच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

 

शेख हसिना यांनी बांगलादेशात परतायला नकार दिला असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा निकाल लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून न आलेल्या सरकारने दिलेला असून राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका हसिना यांनी केली आहे.  

 

दरम्यान, बांगलादेश सरकारने भारताकडे शेख हसिना आणि असदुज्जमान खान कमाल या दोघांचा ताबा मागितला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या प्रत्यार्पणाच्या करारानुसार फरार आरोपींचं हस्तांतर करणं भारताला बंधनकारक असून असं न करणं हे न्यायाचा अवमान ठरेल असं बांगलादेशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. 

 

या निकालाची नोंद घेतल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. शेजारी राष्ट्र म्हणून भारत नेहमीच बांगलादेशातल्या नागरिकांचा हिंतचिंतक आहे, बांगलादेशात शांतता, स्थैर्य नांदावं अशी भारताची इच्छा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.