बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कल्याणकारी योजना राबवणार – उपमुख्यमंत्री शिंदे

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आज मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. घरोघरी आरोग्य तपासणीची सुविधा देणारी आरोग्य आपल्या दारी मोहीम प्रथम मुंबईत आणि नंतर राज्यात इतरत्र राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.  प्लास्टिक मुक्त गड किल्ले अभियान जागतिक वारसा यादीतल्या ११ किल्ल्यांवर आणि नंतर इतर किल्ल्यांवर चालवण्यात येणार आहे. त्यात सहभागी स्वयंसेवी संस्थांना १ लाख रुपये मानधन मिळेल. महिला बचत गट सक्षमीकरण, मराठी भाषा संवर्धन, रस्ता सुरक्षा, ज्येष्ठांसाठी एसटी संगे तीर्थाटन, या कामांसाठी प्रत्येकी  १००कोटी रुपये तरतूद असेल. राज्यातल्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी स्पर्धा घेऊन पहिल्या ३ शाळांना रोख पारितोषिकं दिली जाणार आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. 

 

झोपडपट्टी मुक्त मुंबई,तसंच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्याकरता आपलं सरकार काम करील असं ते म्हणाले.