डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशभरात बकरी ईदचा उत्साह

देशभर आज पारंपरिक उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा केल्या जात असलेल्या ईद-ऊल-अझहा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांनी ईदगाह आणि मशिदीत जाऊन ईद नमाज अर्पण केले आणि नंतर परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राजधानी दिल्ली जमा मशिद, फतेहपुरी मशिद आणि शाही ईदगाह इथं ईदचा मुख्य सोहळा झाला. 

 

ईदचा सण हा त्याग, श्रद्धा आणि मानवी मूल्यांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा सण समाजात एकता, प्रेम आणि बंधुभावाचा प्रसार करतो असं त्या म्हणाल्या. 

 

ईदचा सण सर्वांना त्यागाच्या सामर्थ्याची आणि उदारतेच्या शक्तीची जाणीव करून देतो असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ईद-ऊल-अझहाच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या निःस्वार्थी आणि सेवेच्या मूल्यांमुळे देशाची लोकशाही रचना समृद्ध होत आपल्या वैविध्यपूर्ण समाजातील बंध अधिक दृढ होतात असं ते म्हणाले . 

 

या सणामुळे समाजात सुसंवादाची प्रेरणा आणि शांतीचे बंध अधिक दृढ होतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सर्व नागरिकांना सुदृढ आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत