राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर बाबा यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाचा तपास आज सकाळपासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. पथकानं घटनास्थळाचा पंचनामा केला असून, ताब्यातील दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणतीही टोळी पुन्हा सक्रीय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार सिद्दिकी यांच्या पार्थिवावर मरीन लाईन्स इथल्या बडा कब्रस्तान दफनभूमीत शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

राजकीय नेत्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. चौकशी दरम्यान पोलिसांनी आणखी एका संशयिताची ओळख पटवली असल्याचं वृत्त आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.