ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इथं ठेवण्यात येईल. संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
बाबा आढाव यांनी शेतमजूर, हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करुन त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते. जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबवली. आपलं संपूर्ण आयुष्य कष्टकरी श्रमिकांच्या हक्कांसाठी, समाजासाठी वेचणाऱ्या बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, आणि कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.