December 14, 2025 8:15 PM | austrelia | sidney

printer

ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉण्डी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या गोळीबारात १२ जण ठार

ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉण्डी समुद्रकिनाऱ्यावर आज  संध्याकाळी झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोरासह १२ जण ठार  झाले. तर आणखी एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हल्ल्यात  दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २९ जण जखमी झाले आहेत. ही घटना  धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँटोनी अल्बानीस यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलियात निर्माण झालेल्या यहुदींविरोधी वातावरणाचा हा परिणाम असल्याचं मत  इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडीयॉन  सार यांनी  व्यक्त केलं. हनुक्का या यहुदी सणाच्या पहिल्या दिवशीच तो साजरा करणाऱ्या नागरिकांवर हा हल्ला झाला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत  निषेध केला आहे. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेची भारताची  भूमिका असून, सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भारताचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेयन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला तसंच दहशतवादाविरोधात युरोपीयन युनियन उभी आहे, असं त्या म्हणाल्या.