ऑस्ट्रेलियाच्या सैन्यासोबत होणाऱ्या ऑस्ट्राहिंद २०२५ या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय सैन्याच्या १२० जवानांचं पथक ऑस्ट्रेलियात दाखल झालं आहे. हा सराव संरक्षण सहकार्य आणि परस्पर विश्वासाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने होत असल्याचं कॅनबेरा इथल्या भारतीय उच्चायुक्तालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
हा सराव खुल्या आणि निमवाळवंटी प्रदेशातल्या युद्धांवर केंद्रित असेल. या सरावात सैन्याचं नियोजन, सामरिक कवायती आणि विशेष शस्त्रास्त्र कौशल्य यांचा समावेश असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातलं संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्याबरोबर बैठक घेतली होती.