दक्षिण कोरियातील गुमी इथं झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 24 पदकांसह पदकतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. भारतानं 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कास्यपदकं जिंकली. अनिमेश कुजूर आणि पारुल चौधरी यांनी या स्पर्धेत नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले.
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतानं 3 रौप्य आणि 3 कास्यपदकं जिंकली. महिलांच्या 4 गुणिले 100 मीटर शर्यतीत, श्रावणी नंदा, अभिनया राजराजन, स्नेहा एसएस आणि नित्या गंधे यांच्या भारतीय संघानं रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या 5000 मीटर अंतिम फेरीत, पारुल चौधरीनं रौप्यपदक जिंकलं, तर सचिन यादवनं पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकलं. पूजानं महिलांच्या 800 मीटर अंतिम फेरीत, तर अनिमेश कुजूरनं 200 मीटर स्पर्धेत आणि विद्या रामराजनं 400 मीटर अडथळा स्पर्धेत कास्यपदक जिंकलं.