आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत नवव्यांदा अजिंक्य

आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत काल अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत आशिया चषकाला नवव्यांदा गवसणी घातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

 

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव १४६ धावांमध्ये आटोपला. भारताच्या तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्यातील अर्धशतकी भागीदारीमुळे भारताला दोन चेंडू शिल्लक असताना विजय मिळाला. कुलदीप यादवनं चार गडी बाद करून संपूर्ण मालिकेत सर्वाधिक सतरा बळी घेतले. तिलक वर्मा सामनावीर तर अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला.

 

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं सामन्यात मिळालेली रक्कम भारतीय सैन्याला देण्याची घोषणा केली. भारतीय संघाने पाकिस्तानी पदाधिकाऱ्यांच्या हातून चषक स्वीकारायला नकार दिला.