केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काल गुजरातमधल्या अहमदाबादजवळील साणंद इथं सीजी पॉवरच्या पहिल्या बाह्यकंत्राटी जुळवणी आणि चाचणी सुविधेच्या पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रसंगी बोलताना, भारतातील सेमीकंडक्टर उद्योगासाठी हा एक मैलाचा दगड असल्याचं सांगत या प्रकल्पामध्ये पहिली मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप तयार केली जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.
2032 पर्यंत कुशल सेमीकंडक्टर व्यावसायिकांची जागतिक कमतरता एकीकडे जाणवत असताना केंद्र सरकारनं या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी देशातील 270 विद्यापीठांना अत्याधुनिक चिप उत्पादन तंत्रज्ञानानं सुसज्ज केल्याचं ही वैष्णव यांनी सांगितलं. साणंद इथं काल उद्घाटन झालेल्या या प्रकल्पात दररोज पाच लाख चिप्सची निर्मिती करण्याची क्षमता असणार असून चिप असेंब्ली, पॅकेजिंग, चाचणी आणि चाचणीनंतरच्या सेवा हाताळण्यासाठी हा प्रकल्प सुसज्ज असेल. तसंच हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्णपणे कार्यरत होईल.