आषाढीवारी स्वच्छ आणि सुंदर करण्यावर प्रशासनानं भर दिला असून वारकऱ्यांना मुलभूत सेवा सुविधा आणि आरोग्य सेवा देण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. जिल्हा प्रशासनं यंदा वारीसाठी जवळपास ११ हजार टॉयलेट उभारणार आहे. तर महिला वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी जवळपास दीड हजार स्नानगृहे उभारण्यात येणार आहेत. तसंच गर्दी होणाऱ्या १३ ठिकाणी हॉटस्पॉट तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी प्रशासन विशेष लक्ष देणार आहे. पावसाची शक्यता लक्षा घेता पंढरपूर शहर, पालखी तळ आणि ६५ एकर परिसरात जवळपास ७५ हजार घनमीटर मुरमीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तसंच वारकऱ्यांसाठी जवळपास ७ लाख १२ हजार चौरसमीटर मंडप उभारण्यात येणार आहे. वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी फिल्टर केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसंच आरोग्य विभागाच्या वतीने जवळपास साडेचार हजार औषधांचे कीट देण्यात येणार आहे.
यंदाच्या वारीसाठी शासनाकडून आता पर्यंत जवळपास १५ कोटी रुपये मिळालेले आहेत. काही रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यात येणार आहे. वारीनंतर स्वच्छता मोहिम घेण्यात येणार असून त्यात दीड हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.