केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमधे हा प्रकार झाल्याचं खडसे यांनी सांगितलं. संबंधित आरोपीला ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज मुक्ताईनगर पोलीसठाण्यात जमले होते असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात असून गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडनवीसांनी राजीनामा द्यावा, तसंच पोलीस महसंचालकपदावरुन रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. सुरक्षारक्षक सोबत असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते आणि आरोपीला अटक करावी या मागणीसाठी प्रत्यक्ष मंत्री रक्षा खडसे यांना पोलीसठाण्यात ठिय्या द्यावा लागतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचं स्पष्ट होतं, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.