अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात १४ मजूर ठार, ७ बेपत्ता

अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यात एक डंपर हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ जण ठार आणि ७ जण बेपत्ता झाले आहेत, तर १ जण बचावला आहे. हे सर्व बांधकाम मजूर आसाममधल्या तिनसुकिया जिल्ह्यातले असून ते गेल्या सोमवारी कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. ही घटना अत्यंत दुर्गम भागात घडली. 

 

त्यामुळे या दुर्घटनेबाबत उशिरा माहिती मिळाल्याचं तिनसुकियाच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आतपर्यंत १४ मृतदेह सापडले असून इतर ७ जणांचा शोध सुरु आहे. 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे.