आज ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’

आज सशस्त्र सेना ध्वज दिन आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांचा आणि शहीदांचा सन्मान करण्यासाठी १९४९ पासून, ७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी त्यांचं एका महिन्याचं वेतन दान केलं. सर्व नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत स्वेच्छेने योगदान देऊन देशाचे सैनिक, शहीद आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात केलं आहे. 

 

आपल्या अढळ धैर्याने देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांबद्दल देश मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या आहेत. सैन्यदलाची शिस्त, दृढनिश्चय आणि मातृभूमीविषयी अपार प्रेम देशाला बळकटी देण्याचं काम करतं असं मोदी आपल्या संदेशात म्हणाले. 

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सशस्त्र दलांचं शौर्य आणि बलिदानाला समाजमाध्यमावरच्या संदेशातून अभिवादन केलं आहे. निःस्वार्थ भावनेने सशस्त्र सेना देशाची सेवा करते. त्यांच्या सन्मानासाठी आणि बळकटीसाठी देशवासीयांनी ध्वज दिन निधीमध्ये योगदान द्यावं, असं आवाहन सिंह यांनी आपल्या संदेशातून केलं आहे. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनीही सशस्त्र सेनांची अदम्य देशभक्ती, सेवाभाव आणि देशाच्या सुरक्षेत दिलेल्या योगदानाचं कौतुक आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशातून केलं.