शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत विधान परिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले. दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं.
आज नियमित कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली. अनिल परब यांच्या म्हणण्याच्या अर्थाचा अनर्थ करण्यात आला मात्र काही अवमानकारक असल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं. विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे या वादावर पडदा पडावा अशी अपेक्षा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर सुरळीत कामकाज सुरू झालं.
विधान परिषदेत आज २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यानं राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केली.