आंध्र प्रदेशातल्या अल्लुरी सीता रामाराजू जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत. तुळसीपाका गावाजवळ चिंतुरू-मरेदुमिल्ली घाट या रस्त्यावरून ही खासगी बस तेलंगणा राज्याकडे जात होती. पोलिसांनी घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना भद्राचलम इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे आणि जखमी लवकर बरं व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.