आंध्र प्रदेशमध्ये कुर्नुल इथे आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला. हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही खाजगी बस दुचाकीला धडकल्यानंतर तिनं पेट घेतला. बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवाशी बाहेर पडू शकले नाहीत.बसमध्ये ४१ प्रवासी होते, त्यातल्या २१ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, आंध्र प्रदेश सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आणि जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.