इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं झालेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दूसरा सामना भारतानं ३३६ धावांनी जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या विजयामुळे भारतानं मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे. धावांचा विचार करता भारताचा हा परदेशातील सर्वांत मोठा विजय ठरला आहे. तर भारतानं प्रथमच कसोटीत १ हजार पेक्षा धावा केल्या आहेत. काल सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडने ३बाद ७२ धावांवरून डाव सुरू केल्यानंतर विजयासाठी ६०८ धावांचं उद्दिष्ट गाठताना यजमान संघाचा डाव २७१ धावांवर आटोपला. आकाशदीपने दुसऱ्या डावात ६ बळी घेत या कसोटीत एकंदर १० बळी घेतले.
या सामन्यात दोन शतक ठोकणाऱ्या आणि अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरलेल्या शुभमन गिल याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. कोणत्याही आशियाई संघाने बर्मिंगहॅममध्ये कसोटी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिसरा कसोटी सामना येत्या १० जुलैपासून लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.