देशभरात काल अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता झाली. पुढच्या वर्षी लौकर येण्याचं आवाहन करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
मुंबईत अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे. कालपासून गिरगाव चौपाटीसह विविध विसर्जन स्थळांवर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.
मुंबईच्या गणेशविसर्जन सोहळ्याचं आकर्षण असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन तराफ्यातल्या बिघाडामुळे बराच वेळ खोळंबलं होतं, ते काही वेळापूर्वी गिरगाव चौपाटीवर झालं. तसंच उमरखाडीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह सुमारे २० सार्वजनिक गणेशमंडळांच्या मानाच्या बाप्पाचं विसर्जनही शांततेत होत आहे. भर पावसातही लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गणरायांचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली आहे. त्यांच्या सोयीसाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले आहेत. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी गिरगाव चौपाटीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणुकीत मुंबईत नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर आत्तापर्यंत सुमारे २ हजार ७०० सार्वजनिक मूर्ती, २६ हजारापेक्षा घरगुती मूर्ती, तर ३०७ गौरींचं विसर्जन झाल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. अनंतचतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणायची धमकी देण्यात आली होती, मात्र या प्रकरणातल्या आरोपीला काल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नोयडा इथून अटक केली.
हैदराबादमध्ये २ लाखापेक्षा जास्त गणेशमूर्तींचं विसर्जन शांततेत पार पडलं. खैरताबादच्या ६९ फूट उंचीच्या महागणेश मूर्तीचं विसर्जन हुसैनसागर तलावात करण्यात आलं.