अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार-मराठी भाषा मंत्र्यांची घोषणा

बीड इथं जिल्हा गुंतवणूक परिषद काल घेण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. यातून असंख्य रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून जाहीर करणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऐकूया या संदर्भातला हा विशेष वृत्तांत..
मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी असलेलं अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. अमरावती इथल्या नियोजित मराठी विद्यापीठाची सहा उपकेंद्रं राज्यभरात होणार आहेत, त्यापैकी एक उपकेंद्र अंबाजोगाई इथं व्हावं, अशी विनंती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मुकुंदराजांच्या विवेकसिंधू या ग्रंथाची शासनामार्फत उपलब्धता तसंच राज्य शासनाच्या विविध वाङ्गमय पुरस्कारांमध्ये मुकुंदराजांच्या नावे पुरस्कार देण्यासंदर्भातही सामंत यांनी माहिती दिली.
प्रसिद्ध साहित्यक दगडू लोमटे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत, या निर्णयामुळे वाचन संस्कृतीला अधिक चालना मिळेल, तसंच वाचकांना आणि मराठी साहित्याच्या अभ्यासकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
अंबाजोगाईत गेली वीस वर्ष पुस्तक वाचक चळवळ चालवणारे आणि त्यातूनच पुस्तकपेटी उपक्रम राबवणारे अभिजीत जोंधळे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.