परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह, युगांडा इथं १५ आणि १६ ऑक्टोबरला होणाऱ्या अलिप्ततावादी चळवळ- नाम च्या १९ व्या मध्यवधी मंत्रीस्तरीय अधिवेशनात भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी आज आणि उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनातून देण्यात आली आहे. या अधिवेशनात सिंह नाममधील सदस्य देशांच्या समकक्ष नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचंही निवेदनात नमूद केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार २०२४ ते २०२६ या कालावधीत नाम चं अध्यक्षपद युगांडाकडे आहे. सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्याची वाढवणं अशी मध्यवधी मंत्रीस्तरीय बैठकीची संकल्पना आहे. नाम या चळवळीचा भारत संस्थापक सदस्य असून या माध्यमातून १२१ विकसनशील देशांना एकत्र आणलं आहे.