राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे मॉक ड्रील करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातल्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
युद्ध स्थितीत बचावासाठी करण्याच्या विविध हालचालींची माहिती आणि प्रशिक्षण नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ब्लॅकआऊटच्या वेळी विशेषतः रुग्णालयांबरोबर समन्वय यंत्रणा उभी करावी, मुंबई महानगरविकास क्षेत्रातल्या सर्व महानगरपालिकांना देखील या जनजागृतीत सहभागी करुन घ्यावं, पोलिसांनी अधिक सतर्क राहून गस्त आणि बंदोबस्त वाढवावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी आजच मिळणार असून तातडीच्या साहित्याची खरेदी आवश्यकतेनुसार तात्काळ करुन घ्यावी, सैन्याच्या हालचालींचं चित्रीकरण करणं आणि समाजमाध्यमांवर ते प्रसारित करण्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करावे. सायबर सेलनं याकरता समाजमाध्यमांवर लक्ष ठेवावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महत्त्वाच्या पदांवरच्या विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.