दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने आज कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली आणि दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे.
खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने बहरीनच्या शूरा कौन्सिलचे अध्यक्ष अली बिन सालेह अल सालेह आणि बहरीनचे उपप्रधानमंत्री शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळानं दहशतवादी कारवायांविरुद्ध भारताची भूमिका मांडली. हे शिष्टमंडळ आता कुवेतला जाणार असून यानंतर सौदी अरेबिया, कुवेत, आणि अल्जेरियाचा दौरा करणार आहेत.
खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज दक्षिण कोरियाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देत भारताची भूमिका मांडली.
खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं, न्यूयॉर्कमध्ये ९/११ स्मारकाला भेट दिली. दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाचे सदस्य असलेले भाजप खासदार तेजस्वी सूर्या आणि खासदार सरफराज अहमद गयाना इथं पोहोचले. यानंतर ते अमेरिका, पनामा, ब्राझील आणि कोलंबिया देशाला भेट देतील.
द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक) पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे रवाना झाले आहेत.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत. या शिष्टमंडळानं दहशतवादा विरुद्धच्या लढ्यात भारताला साथ दिल्याबद्दल संयुक्त अरब अमिरातचे आभार मानले.