स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं, अस केंद्रीय गृहमंती अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उदघाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं ते म्हणाले.
देशाच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे. देशभरातल्या २९ राज्यं विधानसभांचे अध्यक्ष आणि ६ राज्यांच्या विधानपरिषदेचे सभापती तसेच उपसभापती या परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी शाह यांनी विठ्ठलभाई पटेल यांचे जीवन, संसदीय योगदान आणि देशाच्या संसदीय इतिहासावर आधारित प्रदर्शन तसंच माहितीपटाचं उदघाटन केलं. विठ्ठलभाई पटेल यांच्यावर काढलेल्या विशेष टपाल तिकीटाचं अनावरण शहा यांनी यावेळी केलं.