अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा न्यायालयीन चौकशी अहवालाचा निर्वाळा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटरमध्ये झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात दिला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला आज सादर करण्यात आला. आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वापर चुकीचा असून आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत, असं अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. आरोपी अक्षय शिंदे २३ सप्टेंबर २०२४ रोजी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला होता. त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर गोळीबार केल्याचा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.